पाबळ

पार्श्वभूमी:
गावामध्ये महादेवाची पाच मंदिरे म्हणून पाच मंदिरांच बळ असलेले पाबळ. गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणने नुसार १२००० आहे. गावाला बारा वाड्या आहेत. गावाचा मुख्य व्यवसाय शेती आणि मुख्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, भुईमुग आणि कडधान्य यांचा सामावेश होतो. गाव तसे पर्जन्य छायेच्या प्रदेशातील पण गावाच्या बाहेरून वेळ नदी वाहते नदीचे पाणी बारा महिने वापरता यावे आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी म्हणून बंधारा बांधण्यात आला आहे ज्या द्वारे गावाची पाण्याची गरज भागवली जाते. बंधाऱ्या जवळील शेती हि बागायत असून फळ भाज्या आणि ऊसाचे पिक घेतले जाते. परंतु त्याच बरोबर इतरही जोड व्यवसाय केले जातात जसे शेळी पालन, कुकुटपालन,इ. 

गावात सर्व सणोत्सव उत्साहाने साजरे केले जातात. पाबळ गाव हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे याची
प्रचीती गावात प्रवेश करताच होते; गावाला एक मोठे ऐतिहासिक प्रवेशद्वार (वेस) आहे. वेशीलगत भव्य सभागृह असलेले मारुतीचे आणि शंकराचे मंदिर आहे, वेशीतून आत येताच सय्यद बाबाची दर्गा अधिक दोन माजली मशिद आहे,  दोन-तीन दुकाने सोडून पेठेतच एक सुंदर असे जैन मंदिर आहे येथे देशभरातून लोक दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाक्तागनांमुळे रविवारी गावात तुलनेने गर्दी असते; बाहेरून आलेल्या प्रवाशांमुळे गावातील उद्योगांसाठी ग्राहक वर्ग मिळतो.  
प्रत्येक शुक्रवारी गावात मोठा बाजार भरतो पाबळ पंचक्रोशीतील छोटे मोठे व्यापारी व ग्राहक यांची गर्दी जमते. गावामध्ये बाजारपेठ असून कपडे, किराणा, औषधालय, बेकरी, जनरल स्टोअर्स, सोन्याचे दागिणे, इ. ची छोटीशी पण साजेशी दुकाने आहेत. तेलाची मिल, बर्फाचा कारखाना, लाकडाची मिल, इ. गावच्या आर्थिक विकासात भर घालतात.
क्षेत्रपाल श्री भैरवनाथ महाराज हे ग्रामदैवत; गावाची यात्रा माघ पौर्णिमेला भरते. परंपरेने चालत आलेले व यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेली बैलांची शर्यत (गाडे) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बंद करण्यात आले आहेत. गावकर्यांच्या मनोरंजनासाठी यात्रेच्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राची लोककला लावणी नृत्य (तमाशा) असतो, दुसऱ्या दिवशी पाहिलवानांनसाठी पर्वणीच म्हणजेच कुस्तीचा आखाडा जिथे त्यांना शक्ती प्रदर्शनाची संधी मिळते. महिला, तरुण वर्ग, बालके यांच्यासाठी कृत्रिम दागिने, खेळणी, झोके, खाद्य पदार्थ (गुडी शेव- रेवडी वैशिष्ट्य) इ. गोष्टींने यात्रेच्या दिवशी एक वेगळीच शान येते. परगावी कामानिमित्त गेलेली मंडळी, पाहुणे यासर्वांना एकत्र येण्याचे एक छानसे माध्यम जे सर्वांनाच खूप आवडते.
इतकेच नाही तर गावात स्वातंत्र्य दिन  आणि प्रजासत्ताक दिन ही तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात, संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघते; सर्व प्रथम ग्रामपंचायती समोरील ध्वजावंदन करून फेरी पोलीस चौकी, प्राथमिक शाळा, व सर्वात शेवटी माध्यमिक  शाळेत पोहचते. तो देशभक्ती सोहळा गावातील प्रत्येकजण अनुभवतो आणि पालक आपल्या पाल्याचे सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाचे कोड कौतुकही करतात.

गावचे प्रशासन:
गावाचे सरपंच आणि उपसरपंच हे ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक व तलाठी यांचे सहकार्याने गावचे प्रशासन चालवत आहेत. गावातील ग्रामसभेत गावाचा विकास आणि समस्यांविषयी चर्चा होते.

आरोग्य विषयी:
गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून इतरही खाजगी रुग्णालये आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक शुक्रवारी तज्ञ डॉक्टर येतात आणि इतर दिवशी दोन अनुभवी परिचारिका गावास आरोग्य सेवा पुरवतात.

ऐतिहासिक पार्श्वभूमी:
पाबळ या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला तो बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांच्या प्रेम कहाणीमुळे. बाजीरावांनी केंदूर आणि पाबळ हे मस्तानीला जहागीर म्हणून दिलेली गावे. मस्तानीच्या समाधीचे स्थान म्हणून पाबळ प्रसिद्ध आहे.

वैज्ञानिक प्रगती: 
पाबळ गावाला लाभलेले वरदान म्हणजे डॉ. कलबाग यांनी स्थापन केलेले विज्ञान आश्रम; येथे तरुणांना स्वयं रोजगाराचे धडे दिले जातात आणि ते पाठ्य पुस्तकातून नसून स्वतः वस्तू निर्मितीतून दिले जातात. हजारो तरुणांनाचे आयुष्य घडवणाऱ्या या शास्त्रज्ञाचे गावावरती उपकार आहेत. आजही गावापासून १ कि.मी. अंतरावर विज्ञान आश्रम विस्तारत आहे आणि विज्ञानाची जादू ग्रामीण भागात कशी चालते हे पाहण्यासाठी जगभरातून शास्त्रज्ञ, विद्यार्थी, शाळांच्या सहली भेट देत असतात.
विज्ञान आश्रम
http://vigyanashram.com/
http://learningwhiledoing.in/InnerPages/About.aspx
गावाची वेस
श्री क्षेत्रपाल भैरवनाथ मंदिर



मारुती मंदिर सभागृह


मस्तानी ची समाधी

No comments:

Post a Comment